दुचाकीस्वाराच्या गळ्याला लागले सहा टाके, नागरिकांत दहशतीचे वातावरण
गंगापूर (प्रतिनिधी) शहरात पुन्हा एकदा मांजामुळे जीवघेणा अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. शहरातील मुख्य रस्त्यावरून मोटारसायकलवरून जाणाऱ्या एका तरुणाच्या गळ्याला अचानक मांज लागल्याने त्याचा गळा चिरला गेला. या घटनेत संबंधित तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्या गळ्याला सहा टाके घालावे लागले आहेत.
गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथील विष्णु अशोक मनाळ (वय २२) हा तरुण शुक्रवारी २६ डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे ६.४५ वाजता मोटारसायकल (क्र. एमएच २० सीझेड ७८१९) वरून लासूर रोडवरील सह्याद्री हॉटेलच्या दिशेने जात असताना गंगापूर शहरातील महाराणा प्रताप चौकात अचानक पतंगाचा नायलॉन दोरा गळ्याला लागून गंभीर जखमी झाला. नायलॉन दोऱ्यामुळे विष्णु मनाळ यांचा गळा चिरला गेला. घटनेनंतर तात्काळ त्यांना उपचारासाठी जवळील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन व काचयुक्त मांज वापरण्यावर बंदी असतानाही शहरात सर्रासपणे धोकादायक मांज वापरली जात असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होत आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
तेथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून गळ्याला सहा टाके घातले. गळ्याला खोल जखम झाली असली तरी कोणतीही महत्त्वाची नस कापली गेली नसल्याने विष्णु मनाळ यांच्या जीवाला थोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. घटना इतकी भीषण होती की काही क्षणांसाठी तरुणाचा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमीला रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने वेळेत उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचला.
मी नेहमीप्रमाणे मोटारसायकलवरून जात होतो. अचानक गळ्याला मांज लागली आणि क्षणात रक्त येऊ लागले. काही सेकंद उशीर झाला असता तर माझा जीव गेला असता. प्रशासनाने यावर कठोर कारवाई केली पाहिजे.
मी नेहमीप्रमाणे मोटारसायकलवरून जात होतो. अचानक गळ्याला मांज लागली आणि क्षणात रक्त येऊ लागले. काही सेकंद उशीर झाला असता तर माझा जीव गेला असता. प्रशासनाने यावर कठोर कारवाई केली पाहिजे.
- विष्णू मनाळ, जखमी तरुण
नायलॉन मांजामुळे अनेक अपघात होत आहेत. फक्त बंदी घालून उपयोग नाही, प्रत्यक्ष कारवाई झाली पाहिजे. विक्रेते आणि वापरकर्त्यांवर गुन्हे दाखल करावेत. मांज विक्री करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे. शहरात जनजागृती मोहिम राबवून अशा घटनांना आळा घालावा.
- इमरान शेख, नागरिक














